गप्पा टप्पा-शंतनू रोडे
स्वप्नांच्या पाठपुराव्याची गोष्ट
68व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळाला तो ‘प्लॅनेट मराठी’ची निर्मिती आणि शंतनू रोडे यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला. त्यानिमित्तानं या चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू रोडे यांची ही मुलाखत.
कोणत्याही दिग्दर्शकासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणं हे खूप मोठं फीलिंग असतं. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना तुझ्या मनात नेमकी कोणती भावना होती?
चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं वातावरण खूपच छान होतं. 2011 पासून मी हा चित्रपट बनविण्याचा प्रयत्न करतोय. 2019ला त्याच्या शूटिंगला मुहूर्त लागला. 2020 मध्ये खरं तर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण करोना काळामुळे आपल्या सगळ्यांचीच मधली दोन वर्षं खूप वाईट गेली. त्यामुळे या काळात मलादेखील थोडं अस्वस्थ वाटलं होतं. त्यामुळे आमच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित होणं ही खूप सकारात्मक गोष्ट घडली. आमच्यासाठी ती खूप गरजेची गोष्ट होती. त्यामुळे नवा हुरूप आला. आपण चांगलं काम करू शकतो, याची दखल घेतली जातेय याचं खूपच छान फीलिंग होतं. महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणं हे एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासारखंच आहे.
या क्षेत्रामध्ये तू जेव्हा आलास, तेव्हा कधी तुला वाटलं होतं का, आपल्या एखाद्या कलाकृतीचा अशा पद्धतीनं सन्मान होईल ते?
इच्छा तर होती. ‘गोष्ट एका पैठणी’साठी मी माझं ‘बेस्ट’ देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचं असं कौतुक होईल असं वाटलं नव्हतं. माझ्यासाठी तो आश्चर्याचा मोठा धक्का होता.
या चित्रपटामधून तू पडद्यावर नेमकं काय मांडलं आहेस?
या चित्रपटाचा विषय खूप छान आहे. आपल्याला मोठं काहीतरी हवं असतं ही आपली वृत्ती आहे. हीच गोष्ट आम्ही या चित्रपटामधून दाखवली आहे. त्यासाठीचं ‘सिम्बॉल’ बनली आहे ती पैठणी. आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला हवा, हेच या चित्रपटातून दिसतं. या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या इंद्रायणीची आपल्या स्वप्नपूर्तीची ओढ आम्ही यात दाखवली आहे. या व्यक्तिरेखेचा सगळा प्रवास यात उलगडतो. या प्रवासात पैठणी केवळ वस्तूपुरती मर्यादित राहत नाही. ती आपली माती, आपली संस्कृती, परंपरा, संस्कार यांचं दर्शन घडवते. या सगळ्याबरोबरचे आपले बंध या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. यातल्या अनेक घटना माझ्या आयुष्यात घडल्या आहेत. यातली अनेक पात्रं मी माझ्या आसपास वावरताना पाहिली आहेत. यात कल्पनाविश्व खूप कमी आहे. ही गोष्ट प्रेक्षकांना आवडेल असं वाटतं.
चित्रपटामधील कलाकारांची निवड तू कशी केलीस?
या चित्रपटामध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारणारी सायली संजीव ही कलाकार म्हणजे आम्हाला लागलेली लॉटरी आहे, असं मला वाटतं. तिची ‘लुक टेस्ट’ झाल्यानंतर मला या चित्रपटासाठी हवी असलेली ‘इंद्रायणी’ मिळाली होती. तिनं मला तेव्हा विचारलं होतं की, ‘मी नेमकं काय करायचं आहे?’ तेव्हा मी तिला म्हटलं होतं, की तू वेगळं काही करू नकोस. तू फक्त चित्रपटाचा एक भाग बन. तिनं त्यापुढे जाऊन मी कागदावर लिहिलेल्या भूमिकेत आपला आत्मा ओतला. ही व्यक्तिरेखा सायली अक्षरशः जगली आहे. भोर धरणाजवळ आम्ही या चित्रपटाचा काही भाग चित्रीत केलाय. त्या गावात, तिथल्या मातीत ती खूप छान मिसळली होती. सुव्रत, शशांक केतकर, प्राजक्ता, सविताताई, मृणालताई अशा सगळ्या कलाकारांनी आपल्याकडून ‘बेस्ट’ दिलेलं आहे.
करोनाकाळात हा चित्रपट तुम्ही पूर्ण केलात. त्या वेळच्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा होता?
एक तर या काळात बहुतेकांना घरीच बसणं भाग पडलं होतं. परंतु, या काळात ‘पैठणी’च्या रूपानं काम मिळणं हीच मुळात खूप सकारात्मक गोष्ट होती. त्यामुळे कामातील व्यग्रतेमुळे आमच्या मनात तेव्हा कोणतेही नकारात्मक विचार आले नाहीत. खूप वेगवेगळ्या अडचणींवर मात करीत चित्रीकरण पूर्ण केल्यामुळे खूप मजा आली. सुव्रतचं डबिंग आम्ही लंडनहून केलं. अभिनेता लंडनला आणि दिग्दर्शक मुंबईत अशा पद्धतीनं ऑनलाईन डबिंग झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट असावा. प्रत्येक नवीन चॅलेंज पार पडण्यासाठी मी या काळात तयार राहिलो.
तुझा पुढचा प्रवास काय असेल?
खूप सार्या गोष्टी माझ्या विचारात आहेत. त्यातल्या काहींना आता मुहूर्त लाभला आहे. काहींना अजून काही काळानं लाभेल असं वाटतंय.
मंदार जोशी