‘थरार आग्रा भेटीचा’ अशी टॅगलाइन घेऊन आलेला डॉ. अमोल कोल्हे निर्मित आणि कार्तिक केंढे दिग्दर्शित ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात नेमकं काय असेल, याची प्रेक्षकांना आधीच उत्सुकता होती. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आग्रा पर्वाला खूप महत्त्व आहे. कारण रक्ताचा एक थेंब न सांडताही मराठ्यांनी या प्रकरणात दिल्लीच्या आलमगीर औरंगजेबाला शह दिला होता. आग्र्याच्या सुटकेमधील नाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे कमालीचे चातुर्य, धोरणीपणा, मुत्सद्देगिरी पाहायला मिळाली होती. त्यामुळेच डॉ. अमोल कोल्हे हा सगळा घटनाक्रम कसा चित्रीत करतात, याबद्दल उत्कठंता होती. पहिली गोष्ट म्हणजे सुमारे सव्वा दोन तासांच्या लांबीचा हा चित्रपट जेवढा उत्कंठतावर्धक झाला आहे, तेवढाच तो पाहणाऱ्याला खिळवून ठेवण्यातही यशस्वी ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आग्रा सुटकेचा इतिहास आता पुस्तक रूपानं तसेच मालिकांच्या रुपानं सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे माहीत असलेल्या गोष्टीत पाहणाऱ्याला गुंतविण्यासाठी त्याची मांडणी, हाताळणी लेखक-दिग्दर्शक कसे करतात, या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व होतं. याबाबत डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करावं लागेल. तसेच एकीकडे आग्रा भेटीत जो काही थरार सुरू होता, त्याच वेळी दुसरीकडे स्वराज्यात कमालीचे काळजीचे वातावरण होते. राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या मनातील या काळातील घालमेल चित्रपटात चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळाली आहे. हे या चित्रपटाचं आणखी एक मोठं यश मानावं लागेल. चित्रपटाच्या सांगतेला आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली केलेली सुटका थोडी तपशीलात पाहायला मिळायला हवी होती, एवढी एकच खंत चित्रपट संपल्यानंतर जाणवते.
मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचे खरं तर दोन टप्पे पडतात. त्यापैकी पहिला टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून शिताफीनं केलेली आपली सुटका आणि रायगडावर पोचण्यासाठी त्यांनी केलेली अनेक संकटांवर मात हा दुसरा टप्पा. यापैकी या चित्रपटात पहिला टप्पा सविस्तर पाहायला मिळतो. मोघलांनी केलेला अत्याचार आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबरील तहानंतरच्या वाटाघाटींपासून हा चित्रपट सुरू होतो. मग औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान, त्याला महाराजांनी दिलेलं बेधडक प्रत्युत्तर, झालेल्या नाचक्कीमुळे औरंगजेबाचं सूडात झालेलं रुपांतर, महाराजांना संपविण्यासाठी त्यानं आखलेला कट आणि शिवाजी महाराजांनी आजाराचं नाटक करून मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करून आग्र्यातून केलेली सुटका असे ठळक घटनाक्रम या चित्रपटात पाहायला मिळतात. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेमध्ये आता एवढे एकरूप होऊन गेले आहेत की, त्यांच्याकडून अभिनयाच्या आघाडीवर सरस कामगिरी अपेक्षितच होती. ती त्यांनी केलीदेखील आहे. परंतु, या चित्रपटात ते पटकथालेखक आणि संवादलेखक म्हणूनदेखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यातही त्यांनी बाजी मारली आहे. या चित्रपटात बरेच टाळ्या घेणारे संवाद आहेत. प्रत्यक्ष आग्रा भेटीत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नव्हत्या. परंतु, शिवाजी महाराज आग्र्यात असताना इकडे स्वराज्यात जे काही तणावाचं वातावरण होतं, ते चित्रपटात पाहायला मिळतं. चित्रपटामधील आणखी एक जमेची गोष्ट म्हणजे मोजकीच तरीदेखील प्रभावी असलेली विनोदी दृश्यं. अफझल खानाचा काढलेला कोथळा, शायिस्तेखानाची कापलेली बोटं आणि सूरतेच्या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कमालीचं औत्सुक्य आग्र्यातील मोघल सरदार मंडळी आणि सर्वसामान्य लोकांमध्ये झालं होतं. त्याच्यावर हलक्याफुलक्या शैलीनं केलेलं भाष्य हशा निर्माण करणारं आहे. चित्रपटामधील जाणवलेली एक त्रुटी म्हणजे त्याचा झटपट झालेला शेवट. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटल्यानंतर कोणत्या मार्गानं राजगडाला पोचले, याचा इतिहास उपलब्ध नसल्याचं चित्रपटात नमूद करण्यात आलं आहे. परंतु, राजगडावर पोचण्याचा हा प्रवासदेखील निश्चितच अत्यंत थरारक होता. लेखक-दिग्दर्शकांनी काही मिनिटांसाठी तरी त्याची झलक दाखवली असती तरी चित्रपटाची उंची अधिक वाढली असती.
डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा अत्यंत समजून उमजून तरीदेखील अत्यंत सहजपणे साकारली आहे. कमालीचा बोलका चेहरा हे त्यांचं एक अभिनेता म्हणून बलस्थान आहे. त्याचा उपयोग त्यांनी चांगल्या प्रकारे करून घेतला आहे. औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेतील यतिन कार्येकरदेखील आपला ठसा उमटविण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या याच विषयावरच्या लोकप्रिय मालिकेत हे दोन्ही कलाकार एकत्र झळकले होते. आता त्यांना मोठ्या पडद्यावर त्याच रुपात पाहणं हा एक आनंददायी प्रकार आहे. बाल शंभूराजे झालेला हरक अमोल भारतीया चित्रपटात आत्मविश्वासानं वावरला आहे. जिजामातेच्या व्यक्तिरेखेतील प्रतीक्षा लोणकर मोजक्याच प्रसंगांमध्ये लक्षात राहतात. रामसिंगची व्यक्तिरेखा साकारणारा हरीश दुधाडे त्याच्या विशिष्ट राजपूत बोलीमुळे लाघवी वाटतो. सोयराबाईंच्या व्यक्तिरेखेतील मनवा नाईक, पुतळाबाई झालेल्या पल्लवी वैद्य, मिर्झाराजे झालेले शैलेश दातार यांच्यासह इतर व्यक्तिरेखाही सर्वच कलाकारांनी सहजतेनं साकारल्या आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हे मूळचे उत्कृष्ट छायादिग्दर्शक. या चित्रपटासाठी त्यांनी केलेलं छायांकन चांगलं आहे. आग्रा येथील लाल किल्ल्यातील प्रत्यक्ष चित्रीत केलेली दृश्ये चित्रपटाला अधिक उंचीवर नेतात. कार्तिक केंढे यांचं दिग्दर्शन नेटकं आहे. हृषीकेश परांजपे यांची गीतं आणि त्याला शशांक पोवार, रोहित नागभिडे यांनी चढवलेला संगीताचा साज चित्रपटाच्या कथानकाशी मेळ खाणारा आहे. रवी दीवाण यांची साहसदृश्यं, दीपाली विचारे यांचं नृत्यदिग्दर्शन, मानसी अत्तरदे यांची वेशभूषा, राहुल सुरते यांची रंगभूषा दाद देण्याजोगी.