संथ लयीतला परिणामकारक दृश्याविष्कार
नदीला आपण जीवनदायिनी मानतो. अखंड, अविरत वाहणाऱ्या नदीच्या काठावरच आपली संस्कृती, आपलं जीवन फुललं आहे. म्हणूनच तिला आपल्या आयुष्यात आईचं स्थान आहे. परंतु, काळाच्या ओघात आधुनिकीकरणाच्या अट्टहासापायी या नदीचं पात्र आक्रसत गेलं.
विविध पद्धतीच्या प्रदूषणांनी तिला ग्रासलं गेलं. साहजिकच त्याचा विपरित परिणाम आपल्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झाला. त्या परिणामाची एका कुटुंबाची हृदयाचा ठाव घेणारी गोष्ट म्हणजे ‘गोदावरी’ हा चित्रपट. हा चित्रपट ठराविक पद्धतीनं जाणाऱ्या सरधोपट चित्रपटांसारखा नाही. खळाळत्या नदीचं रूप जरी मनोवेधक असलं तरी तिचा संथपणाही तेवढाच मनाला भावणारा असतो. हा चित्रपट तशाच पद्धतीचा काहीसा अनुभव देणारा आहे. निखिल महाजन-प्राजक्त देशमुखचं प्रभावी लेखन, निखिल महाजनचं दिग्दर्शन, जितेंद्र जोशीनं साकारलेल्या मुख्य व्यक्तिरेखेसह इतर कलावंतांनी त्याला दिलेली तोलामोलाची साथ, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत… अशा सामूहिक कामगिरीमुळे ‘गोदावरी’ पाहायलाच हवा.
‘गोदावरी’ची गोष्ट केंद्रीभूत आहे ती निशिकांत महाजन (जितेंद्र जोशी) या जमीनदार कुटुंबातील तरुणाची. निशिकांतचे आजोबा नारोशंकर (विक्रम गोखले), वडील नीलंकठ देशमुख, आई भागीरथी (नीना कुळकर्णी), पत्नी गौतमी (गौरी नलावडे), मुलगी सरिता (सानिया भंडारे) हे कुटुंबातील इतर सदस्य. या देशमुख कुटुंबाची नाशिकमधल्या मुख्य बाजारपेठेत स्वमालकीची दुकानं असतात. त्यातून मिळणाऱ्या भाड्यातून या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतो. नारोशंकर यांचा स्मृतिभंश झाला असून नीलकंठ हेदेखील आपल्या कुटुंबापासून बऱ्यापैकी अलीप्त झालेले असतात. निशी दुकानांचं भाडं गोळा करण्याचं काम करीत असतो. परंतु, या कामात त्याचा जीव रमत नसतो. तसेच गोदाकाठी राहणाऱ्या निशीला दररोज गोदामाईच्या पात्रात होणारं वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण त्रास देत असतं. श्रद्धेपोटी गोदावरीचं पाणी प्राशन करणाऱ्या भक्तांना तो तसं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत असतो. या सर्वांचा परिणाम निशीवर झाला असून त्याचीही मानसिक घुसमट सुरू असते. म्हणूनच आपल्या कुटुंबात न राहता घराच्या जवळच असलेल्या एका इमारतीत त्यानं स्वतःला बंदिस्त करून घेतलेलं असतं. निशीच्या मनाला आनंद देणारी व्यक्ती म्हणजे कासव (प्रियदर्शन जाधव). नदीकाठी वाढलेल्या या मित्राबरोबर चार घटका घालवताना निशीला आनंद मिळत असतो. मात्र अचानक निशीच्या वैयक्तिक आयुष्यात एक घटना घडते आणि त्याचा प्रवास अश्रद्धतेकडून श्रद्धेकडे सुरू होतो. हा प्रवास कसा सुरू होतो आणि त्याचा शेवट नेमका कसा होतो, हे प्रत्यक्ष चित्रपटातच पाहायलं हवं.
अश्रद्धतेपायी नदीपात्राची झालेली दुर्दशा ही काही आजची समस्या नाही. परंतु, या समस्येनं आता अक्राळविक्राळ रूप धारण करायला सुरुवात केलीय. एकीकडे ही समस्या आणि त्या समस्येमधून तीन पिढ्यांमध्ये पडत गेलेल्या अंतराची अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट लेखक निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख यांनी मांडली आहे. चित्रपटामधील बरीच दृश्यं, प्रसंग असे आहेत की, जे पाहिल्यावर आपल्याला प्रश्न पडतात. अर्थात त्याची उत्तरंही पाहणाऱ्याला ज्याच्या त्याच्या विचारधारेप्रमाणे आपोआप मिळतात. सर्वप्रथम इथं गोष्ट नमूद करायला हवी ती चित्रपटाच्या वेगाची. चित्रपटाच्या मूळ गोष्टीमध्येच कमालीचा ठेहराव असल्यामुळे लेखक-दिग्दर्शकानं तो त्याच पद्धतीनं मांडलाय, उलग़डलाय. त्यामुळे चित्रपटाच्या सुरुवातीचा काही काळ कथानकातल्या घटनाक्रमाचा वेग हा संथ वाटतो. प्रसंगी तो थोडा खटकत असला तरी एकदा आपण त्यातल्या पात्रांशी एकरूप झालो की तो सुसह्य वाटतो. निखिल महाजन यांनीच आपल्या गोष्टीचं दिग्दर्शन केलं असल्यामुळे आपण जे काही लिहिलंय ते नेमकपणानं पडद्यावर उतरवण्यात ते यशस्वी ठरलेत. निशीच्या मानसिक घुसमटीमधून त्यांनी पिढीमधला वैचारिक संघर्ष, निसर्गाबद्दलची आपली कमालीची हेळसांड वृत्ती यातले कंगोरे नेमकेपणानं टिपले आहेत. चित्रपटामध्ये एकूण आठ पात्रं असून त्याद्वारे एक वेगळंच विश्व आपल्या समोर येतं. आई-मुलगा, मुलगा-वडील, वडील-मुलगी, मुलगा-आजोबा, पती-पत्नी अशा विविध नात्यांच्या पदरामधील भावबंध दिग्दर्शकानं खूप छान पद्धतीनं सादर केलेत.
लेखक-दिग्दर्शकाला जे हवंय ते शंभर टक्के देण्यात चित्रपटामधील कलाकार आणि तंत्रज्ञांची टीम यशस्वी ठरली आहे. सर्वात कमाल केलीय ती जितेंद्र जोशीनं. आपला मित्र आणि दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत याला आदरांजली वाहण्यासाठी त्यानं हा चित्रपट निर्मिलाय. कदाचित म्हणूनच त्यानं आपल्या व्यक्तिरेखेला निशिकांत हे नाव दिलं असावं. परिस्थितीमुळे नास्तिकतकडे झुकलेल्या निशिकांतमधले चित्रपटाच्या दोन तासांच्या प्रवासात झालेले बदल जितेंद्रनं अतिशय तरलपणे सादर केले आहेत. आपल्या मनातील तगमग आणि कालांतरानं त्याचं वादळात झालेलं रूपांतर जितेंद्रच्या अभिनयातून पाहण्यासाठी आहे. जितेंद्रला या व्यक्तिरेखेसाठी काही पुरस्कारही प्रदर्शनाच्या आधीच मिळालेत. ते किती योग्य आहेत, याची जाणीव या चित्रपटामधील त्याचा अभिनय पाहताना येते. त्याला तेवढीच चांगली साथ दिलीय ती इतर सहकलावंतांनी. नीना कुळकर्णी आणि संजय मोने आपण किती उत्तम अभिनेते आहोत, हे पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे सिद्ध केलं आहे. विक्रम गोखले यांच्या तोंडी सबंध चित्रपटभर फक्त एकच संवाद आहे. तरीदेखील ते या एकमेव संवादाच्या जोरावर आणि आपल्या कमालीच्या बोलक्या चेहऱ्याद्वारे चित्रपटभर आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात. गौतमीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गौरी नलावडेला अत्यंत वेगळ्या भूमिकेत पाहणं हा सुखद धक्का आहे. प्रियदर्शन जाधव प्रत्येक कलाकृतीद्वारे काहीतरी नवीन सादर करतोय. या चित्रपटामधील त्यानं साकारलेली कासवची व्यक्तिरेखा त्यापैकीच एक. सरिताची व्यक्तिरेखा साकारणारी सानिया भंडारे ही बालकलाकार तसेच वेगळ्या भूमिकेत दिसणारा मोहित टाकळकरदेखील लक्षात राहतो. ‘गोदावरी’ चित्रपटाचा परिणाम ठसविण्यात सर्वाधिक मोठं योगदान आहे ते संगीत-दिग्दर्शक ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं. दिग्दर्शक महाजन यांनी चित्रपटामध्ये मोजकेच संवाद ठेवले आहेत. प्रफुल्लचंद्र यांच्या पार्श्वसंगीतानं कथानकाला जे आवश्यक आहे, ते देण्याचं काम केलंय. शमिन कुलकर्णी यांच्या कॅमेऱ्यानं नाशिक परिसर आणि गोदावरीची सगळी रुपं छान टिपली आहेत. एकंदरीत काही तरी वेगळं पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ‘गोदावरी’ हा खूप चित्रपट आहे. तो अवश्य बघाच.
– मंदार जोशी
–