सुपरहिट ‘बबन’च्या यशानंतर प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे तब्बल चार वर्षांनी ‘टीडीएम’ असं अनोखं शीर्षक असलेला मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘बबन ‘चित्रपटाचं संगीत अत्यंत श्रवणीय असल्यामुळे त्यातली सगळी गाणी गाजली. त्यामुळेच ‘टीडीएम’मधील आज प्रदर्शित झालेल्या ‘बकुळा’ या गाण्याबद्दल खूपच अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांपेक्षा अधिक आनंद देण्याचं काम या गाण्यानं केलं आहे.
… हसू आसू एक झाले
तुळशीचे झाड ओले
तिच्या लग्नात रडे बकुळा
आठवांचा थेंब थेंब मोकळा…
अशा आशयघन शब्दांनी गाणं सुरू होतं आणि त्यानंतर गाण्यातील प्रत्येक शब्द आणि त्याला दिलेली चाल श्रोत्यांच्या काळजात घर करते. ओंकारस्वरूप आणि वैभव शिरोळे यांनी गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या शब्दांचं सोनं केलंय. प्रसिद्ध पार्श्वगायक नंदेश उमपनं सदैव स्मरणात राहील असा आवाज या गाण्याला दिलाय. प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणं कसं दिसेल, याची आत्ताच कल्पना नाही. परंतु, या गाण्याच्या प्रसिद्धीसाठी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी जो व्हिडीओ केलाय, त्यात कमालीची कल्पकता आहे. प्रत्यक्ष चित्रपटात दिसणाऱ्या गाण्याचा काही भाग आणि गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या काही भागाची सरमिसळ यात पाहायला मिळते.
विशेष म्हणजे रंगीत आणि कृष्णधवल अशा पद्धतीनं हे गाणं खुलविण्यात आलं आहे. हे गाणं ज्यानं आपल्या आवाजाद्वारे एता वेगळ्या उंचीवर नेलंय, ते प्रसिद्ध गायक नंदेश उमप या गाण्याच्या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नंदेश उमप हे वरच्या पट्टीमधील पहाडी पद्धतीच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, त्यांनी आपल्या इमेजच्या विरुद्ध असलेलं हे गाणं तेवढ्यात ताकदीनं, हळूवारपणे आणि जीव ओतून गायलंय. पूर्वीच्या काळातील संगीतकार मंडळी आपल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणावेळी मोठा वादकांचा ताफा उपयोगात आणत असे. परंतु आताचा जमाना हा डिजिटलचा आहे. त्यामुळे आता सगळं काही डिजिटली निर्माण करता येतं. परंतु, या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या दृश्यात वादकांचा मोठा ताफा पाहायला मिळतो. प्रचलित वाद्यांबरोबरच शहनाई, पिपाणी, सुंदरी अशी वाद्यंदेखील या गाण्याच्या संगीतामध्ये ऐकायला मिळतात. हा बदल निश्चितच सुखावणारा आहे.
‘टीडीएम’मधील नायक-नायिकेची अजून घोषणा झालेली नाही. म्हणूनच दिग्दर्शकानं नायक-नायिकेचा चेहरा शिताफीनं झाकून ठेवला आहे.
‘बकुळा’नं आठवण करून दिली ती लग्नसमारंभातील बिदाईचं सदाबहार ‘बाबुल की दुआएं लेती जा’ या हिंदी गाण्याची. ‘लेक चालली सासरला’, ‘माहेरची साडी’ यांचा अपवाद वगळता मराठीत अशी गाणी कमी संख्येनं बनली आहेत. ‘टीडीएम’मधलं ‘बकुळा’ हे गाणं ही उणीव भरून काढणार असं दिसतंय. या गाण्यामुळे ‘टीडीएम’मधील पुढील गाण्यांच्याही अपेक्षा आता उंचावल्या आहेत. भाऊराव कऱ्हाडे आणि त्यांच्या सगळ्या संगीताच्या टीमचं अभिनंदन.